Dutta Wari

|| श्री गणेशदत्त सरस्वत्यै सद्गुरू शरणं मम: ||

|| श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ||

|| दत्तवारी ||



सालाबादप्रमाणे १७ व्या संकल्पित पंचायतन दत्तवारीचे नियोजन करण्यात येत आहे. तरी सर्व भक्तांना सहकुटुंब, सहपरिवार येण्याचे आग्रहाचे निमंत्रण. संकल्पित दत्तवारी म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्राला वारंवार जाणे किंवा सतत फेऱ्या मारणे त्याला वारी असे म्हणतात. परंतु, हा झाला वाच्यार्थ किंवा शब्दार्थ. दत्तवारी याचा संदर्भ वेगळा आहे. लौकिकातून अलौकिकात, बहिरंगातून अंतरंगात, स्वार्थातून परमार्थात व देहभावातून देवभावात लीन विलिन होण्यासाठी जी वारी करतात तिला भागवत धर्मामध्ये वारी असे म्हणतात. वार्षिक नियमित वारी म्हणजे सातत्य, निरंतरता अखंड करायची साधना!
वारी म्हणजे फेरा. आपल्या जन्ममरणाचा फेरा सुरूच असतो. ती जन्ममरणाची वारंवार होणारी वारी संपुष्टावि व दु:ख, दारिद्रय, भय कष्ट, पिशाच्चबाधा यांनी डागाळलेला मनुष्यजन्माचा फेरा सदासाठी बंद व्हावा यासाठी नैष्ठिक यात्रा केली जाते. तिला वारी असे म्हणतात.
कलियुगाच्या वाढत्या प्रवाहाबरोबर सर्व जीवांची होरपळ सुरू होते. ती होरपळ सदासाठी बंद व्हावी त्यासाठी प्रत्येकजण आपल्या पद्धतीने मार्ग शोधत आहे. परंतु, प्रत्येकाला पुरकसा मार्ग मिळत नाही. आम्हाला साधु-संतांसारखे गिरीकंदात गुहेत किंवा गंगाकिनारी जावून वज्रकठोर तपश्चर्या करणे हे प्रत्येक सर्व प्रापंचिकाचे काम नव्हे. हे लक्षात घेऊन आमच्या दूरदृष्टीच्या परात्पर सद्गुरूंनी व मातृपितृ तुल्य ज्ञानऋषि दत्तदास दहिवलीकर महाराज यांनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर गाणगापूर क्षेत्री खडतर साधना व गुरूचरित्र या अनमोल ग्रंथाची १००८ पारायणे करून दत्तरायांचे दर्शन प्राप्त केले. दत्तरायांकडून कृपा प्रसादाचे फलितही प्राप्त करून घेतले. ते आपल्या शिष्यांकरवी श्री क्षेत्र नारायणपूर / श्री क्षेत्र कळंब / श्री क्षेत्र रायपाटण येथे पेरले. त्या पेरलेल्या बीजांकुरातून सुंदर देखणे कल्पवृक्ष उद्यास आले त्याचे नाव श्री क्षेत्र रायपाटण प्रति गाणगापूर असे म्हटले जाते. श्री क्षेत्र रायपाटण तीर्थक्षेत्रांचे शिल्पकार प.पू.दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी यांनी ध्यान, यज्ञ-याग, नवरात्र उत्सव (१५ वर्षे नैसर्गिक विधी बंद करून अनुष्ठान केले) व जनकल्याणासाठी देह झिजवला. त्याचे फळ सद्गुरूकरवी दत्तवारी हे अमृतरूपी फळ प्राप्त केले व सर्व सामान्य समाजाला वारी हा सर्वात सोपा व सुलभ मार्ग उपलब्ध करून दिला. दत्तवारी या मार्गावर भाविक मोठ्या संख्येने वाटचाल करत आहेत.
वाही हा बहुउद्देशीय आणि उपदेशीय कार्यक्रम. गाणगापूर कलैश्वर या स्थानी संकल्प या स्वरूपात करण्यात आला. दत्ताचिया भक्ता नाही भय चिंता या नामाच्या उच्चाराने देश-परदेशातील हजारो भक्त व्यसन आणि व्याधिमुक्त झाले आहेत. ही पोचपावती प्रत्येक भक्तांकडून मिळते. वास्तविक वारी हा आध्यात्मिक आणि सामाजिक चळवळीचा कार्यक्रम आहे. ही आध्यात्मिक चळवळ दु:ख, दारिद्र्य़, भय, कष्ट, पिशाच्चबाधा या पंचसूत्री तत्त्वांशी समाविष्ट आहे. पंचायतन वारीचे वैशिष्ट्ये म्हणजे वारीचे ५ दिवस, ३६५ दिवसातले ५ दिवस, ५ तत्त्वे, ५ ठिकाणे (श्री क्षेत्र रायपाटण, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र अक्कलकोट, श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र पंढरपूर) पंचम भक्ती. पंचम भक्ती म्हणजे अभिषेक व स्नान वारीमध्ये स्नान पर्वणीला आध्यत्मिक महत्त्व आहे. पवित्र नदीत स्नान केल्याने स्वत:ची पापे धुवून पितरांना मुक्ती देता येते. या दोन्ही गोष्टी स्नान पर्वणीमध्ये साधता येतात. या सगळ्या कार्यक्रमांचा परमोच्च हेतू म्हणजे हरिची कृपा प्राप्त करणे. कारण हर नामाच्या उच्चाराणे जीवाची भूतबाधा नष्ट होते.
वारीच्या पाच दिवसात भजन, दिंडी, ध्यानधारणा व सत्संग करून परमेश्वराची करूणा भाकतो. त्याला आळवतो. त्याला आम्ही आमची दु:खे सांगतो. परमेश्वरा समाजातील लाचारी, अत्याचार, व्यभिचार, उद्योगधंदा आणि आजच्या जीवनातील मॉर्डन जीवन सगळ्यात महत्त्वाचे, संसाराच्या गाड्यातला महत्त्वाचे प्रश्न म्हणजे मुले, शिक्षण, त्यांचे संगोपन, या सगळ्या गोष्टींचा कडेलोट झाला आहे. हे फुलबॉलसारखे जीवन जगता जगता आम्ही खूप थकलो आहे. आम्हाला शांती हवी आहे. तुझ्या कृपाप्रसादाने मंगलमय व शांतीदायी रामराज्य येऊ दे. यासाठी आम्ही सारे भक्तगण चकोर पक्षाप्रमाणे तुझ्या रामराज्याची वाट पाहत आहोत. 

शुभं भवतु... वारी वारी दु:ख निवारी!

                                                           
                               सद्गुरू स्वामी महादेवानंदजी (बांबरकर महाराज)