श्री दत्त संप्रदाय आणि उपासना


दत्तसंप्रदाय हा प्रत्यक्षवादी, सगुणवादी आहे. जीवनाला आवश्यक असलेल्या मंत्रशास्त्राचे संवर्धन करण्याचे महान कार्य आजवर दत्तसंप्रदायाने केले आहे. आपल्या भारतात जे अनेकानेक धार्मिक संप्रदाय आहेत त्यात दत्तसंप्रदायहा एक प्रमुख संप्रदाय मानला जातो. यालाच अवधूत संप्रदायअसेही संबोधिले जाते. दत्तात्रेयहे या संप्रदायाचे आराध्य दैवत होय !शैव, वैष्णव व शाक्त या तीनही उपासना प्रवाहांना व्यापणारा दत्तात्रेयांचा प्रभाव सर्व भारतभर गाजत आहे. आपल्या महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, सांप्रदायातीत किंबहुना धर्मातीत आहे. महानुभाव, नाथ, वारकरी आणि समर्थ संप्रदायात दत्तात्रेयांविषयी उत्कट श्रद्धाभाव आहे. दत्तात्रेय हे विष्णूचे अंश असून अत्रि अनसूयेचे पुत्र आहेत; परंतु ते अयोनिसंभव आहेत.
महाराष्ट्रातील दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, संप्रदायातीत किंबहुना धर्मातीत आहे. नाथसंप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संपद्राय या चारही संप्रदायांत दत्तात्रेयांविषयी गाढ श्रद्धा आहे. तसेच दत्तभक्तीचीच परंपरा विशेष करून चालविणारा दत्तसंप्रदायही महाराष्ट्रात शेकडो वर्षे अस्तित्वात आहे.
दत्तोपासनेमुळेच अशा सिद्धी दत्तोपासकांना प्राप्त होतात आणि त्यांच्या साहाय्याने ते आपली दु:खे दूर करू शकतात. आपल्या कामनांची पूर्ती करू शकतात. ही जी भावना सर्वसामान्यांच्या मनात प्रथमपासून रूजत गेली. त्यातच दत्तसंप्रदायाच्या भक्तप्रियतेचे रहस्य दडलेले आहे. केवळ दर्शन-स्पर्शाने वा आशीर्वादाने सिद्धपुरूषांनी आपल्या व्यथा-वेदना त्वरित नाहीशा करून मनोकामना पूर्ण कराव्यात. अशीही बहुतेक भक्तांची किमान अपेक्षा असते. दत्तात्रेयांची उपासना गुरूस्वरूपात करावयाची असते. कारण ते 'गुरूदेव' आहेत. परिणामी गुरू संस्थेला प्राधान्य देणाऱ्या सर्व संप्रदायात दत्तात्रेयांची पूज्यता रूढ झाली.

श्रीपाद श्रीवल्लभ, पीठापूर, आंध्रप्रदेश

श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लीम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्या वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या.

श्रीनृसिंहसरस्वती स्वामी

कारंजा (लाड) जि. वाशिम या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी श्रीदत्तात्रेयांनी श्रीनृसिंहसरस्वती म्हणून जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व श्रीनृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचेच कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्रीदत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला.

श्री स्वामी समर्थ

आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली.

श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री

श्रीपंत महाराज हे फार मोठे दत्तभक्त होते. त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दिक्षा घेतली होती. श्रीपंतमहाराजांनी मराठी आणि कन्नड भाषेमध्ये विपुल लिखाण केले आहे. त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची शेकडो पदे, भजने, आरत्या उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर कृपा केली. श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर कृपा केली. आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंतमहाराजांवर कृपा केली अशी ही परंपरा आहे. श्रीदत्तात्रेयावर आणि अवधूतांवर निरतिशय प्रेम हीच अवधूत परंपरेची साधना आहे. अवधूतपंथामध्ये बंधने नाहीत. येथे मुक्तीलाही कमी लेखले आहे. मुक्तीपलीकडची प्रेमभक्ती अशी अवधूत परंपरेची धारणा आहे.

श्रीमाणिकप्रभू

बिदरजवळील हुमणाबाद येथील श्रीमाणिकप्रभू हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात.  ते ऐश्वर्यसंपन्न आणि राजयोगी होते. या परंपरेला ‘सकलमत’ परंपरा असे म्हटले जाते. ही एकमेव परंपरा अशी आहे की जिथे गादी परंपरा आहे. या परंपरेमध्ये सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. कित्येक मुसलमान, जैन, लिंगायत व्यक्ती या परंपरेच्या आहेत. साधुसंत, बैरागी, शेठ सावकार, राजे, सरदार, संस्थानिक, पंडित शास्त्री, गायक, संगितकार येथे सर्वसामान्य भक्तांबरोबर  येत असतात. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आणि देदीप्यमान अशी ही दत्तपरंपरा आहे. निजामाच्या राजवटीमध्ये तिचा उगम झाला. 

श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी

श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी श्रीदत्तात्रेयांची शास्त्रशुद्ध उपासना पुन:स्र्थापित करण्याचे श्रेय श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी यांच्याकडे जाते. सावंतवाडीजवळील माणगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे आले. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला आणि दत्त संप्रदायाची पताका सर्वत्र फडकवली. त्यांनी विपुल लेखन केले असून शंकराचार्यानंतर इतके विपुल साहित्य निर्माण करणारे ते एकमेव संत आहेत. त्यांनी संपूर्ण देशामध्ये २४ चातुर्मास केले. विविध दत्तस्थानांचा त्यांनी मागोवा घेतला. आणि त्यांचे पुनज्जीवन केले. प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहवाडी येथे अनुग्रह दिला, असे मानले जाते.

|| श्री  ॐ श्रीगुरूदेव दत्तात्रेयायनम: | श्री वासुदेवानंद सरस्वतीकृत ||