पंचायतन सद्गुरू दत्तवारी २०२४

 || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || श्री गणेश दत्त सरस्वतै सद्गुरू शरणं ममः ||

|| सद्गुरु दत्तवारी ||

चैतन्य सद्गुरू प.पू.दत्तदासाचे दास स्वामी महादेवानंदजी महाराज यांच्या कृपादृष्टीखाली

दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ ते २५ नोव्हेंबर २०२४

दत्तदास सद्गुरू सेवा मंडळ-नामदिंडी

श्री क्षेत्र रायपाटण (दत्तमंदिर) ता.राजापूर, जि. रत्नागिरी


|| दत्ताचिया भक्ता । नाही भय चिंता ।।

|| विश्वंभरा तू केशवा | आदी नमो गणराया ||

|| तीर्थयात्रा श्रद्धागहन | तीर्थाटन या नाव ||

सर्व भाविकांना कळविण्यास अत्यानंद होतो की, ज्या क्षणांची आपण सर्व भाविक, सर्व सद्गुरू या शिष्य परिवार आतुरतेने वाट बघत होते तो क्षण आणि दिवस लवकरच आला आहे. प्रति वार्षिकप्रमाणे सद्गुरू दत्तवारीचे आयोजन कार्तिक मार्गशीर्ष शके १९४५ कार्तिक कृष्ण शुद्ध षष्ठी गुरुवार दि. २१ नोव्हेंबर २०२४ ते कार्तिक कृष्ण दशमी मंगळवार दि. २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे.

पंढरपूरची वारीची सुरुवात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व संत श्री. एकनाथ महाराज यांनी केली. त्यानंतर ही वारी परंपरा आजपर्यंत अखंड अविरत चालूच आहे. या परंपरेत सर्व दत्तभाविकांसाठी सद्गुरू संकल्पनेतून "दत्तवारीचा" पाया आपले सद्गुरू स्वामी महादेवानंदजी महाराज यांनी रचला. रंजल्या गांजल्या, दुःखी-कष्टी, प्रपंचातून निर्माण होणारी अडचण, मुलांचे प्रश्न, कौटुंबिक अडचणी दूर करण्यासाठी आपल्या सद्गुरूंनी गाणगापूर येथे कल्लेश्वर तीर्थक्षेत्री "दत्तवारीसाठी' सर्व शिष्यांसमवेत संकल्प केला. संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव निघणारी आपल्या सद्गुरूंची दत्तवारी या नावे आज कित्येक वर्षे नाम दिंडी अविरत चालू आहे.

या नामस्मरणाच्या दत्तवारीत अनेक भाविकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या व त्यांना सद्गुरूंना म्हणजेच दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद मिळाला. दत्तवारीत सद्गुरूंच्या या समुद्राला वेगवेगळ्या सांप्रदयाच्या वेगवेगळ्या नद्या एकत्र येऊन मिळाल्या हीच तरी परमेश्वराची कृपादृष्टी.

सद्गुरू दत्तवारीचे महत्त्व म्हणजे वारीचे ५ दिवस, ३६५ दिवसांचे ५ दिवस, ५ तत्वे, ५ तीर्थक्षेत्र (श्री क्षेत्र - तुळजापूर, अक्कलकोट स्वामी, गाणगापूर, पंढरपूर, श्री क्षेत्र रायपाटण - दत्तमंदिर - समाधी मंदिर) आणि यामध्ये तीर्थक्षेत्री पर्वणीस्थान यामुळे आपल्या कुटुंबात गेलेल्या वंशजांना (पितरांना) मुक्त करून मोक्षाची वाट मोकळी होते. अशा अनेक गोष्टी दर्शन यात्रेतून घडणार आहे. तर चला या भक्तीमय वातावरणातून परमेश्वराच्या दर्शन यात्रेत सहभागी होऊया आणि नामस्मरण आरती, हरीपाठ, भक्तीभजने, नाम-चिंतन, सत्संग, शिवाभिषेक, दिंडी पताका हातात घेऊन हा वैष्णवांचा मेळावा नाचत गाजत भगवंताच्या दर्शनाला जाऊ या. आपल्या सर्वांवर आपल्या कुटुंबावर भगवंताची कृपादृष्टी कायमस्वरूपी राहू दे हिच सद्गुरू चरणी प्रार्थना!

त्रिपुरारी हरि तुझे वारीचा मी वारकरी! हीच आमची सद्गुरू दत्तवारी!

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||