Dutta Wari

|| श्री गणेशदत्त सरस्वत्यै सद्गुरू शरणं मम: ||

|| श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ||

|| दत्तवारी ||



सालाबादप्रमाणे १७ व्या संकल्पित पंचायतन दत्तवारीचे नियोजन करण्यात येत आहे. तरी सर्व भक्तांना सहकुटुंब, सहपरिवार येण्याचे आग्रहाचे निमंत्रण. संकल्पित दत्तवारी म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्राला वारंवार जाणे किंवा सतत फेऱ्या मारणे त्याला वारी असे म्हणतात. परंतु, हा झाला वाच्यार्थ किंवा शब्दार्थ. दत्तवारी याचा संदर्भ वेगळा आहे. लौकिकातून अलौकिकात, बहिरंगातून अंतरंगात, स्वार्थातून परमार्थात व देहभावातून देवभावात लीन विलिन होण्यासाठी जी वारी करतात तिला भागवत धर्मामध्ये वारी असे म्हणतात. वार्षिक नियमित वारी म्हणजे सातत्य, निरंतरता अखंड करायची साधना!
वारी म्हणजे फेरा. आपल्या जन्ममरणाचा फेरा सुरूच असतो. ती जन्ममरणाची वारंवार होणारी वारी संपुष्टावि व दु:ख, दारिद्रय, भय कष्ट, पिशाच्चबाधा यांनी डागाळलेला मनुष्यजन्माचा फेरा सदासाठी बंद व्हावा यासाठी नैष्ठिक यात्रा केली जाते. तिला वारी असे म्हणतात.
कलियुगाच्या वाढत्या प्रवाहाबरोबर सर्व जीवांची होरपळ सुरू होते. ती होरपळ सदासाठी बंद व्हावी त्यासाठी प्रत्येकजण आपल्या पद्धतीने मार्ग शोधत आहे. परंतु, प्रत्येकाला पुरकसा मार्ग मिळत नाही. आम्हाला साधु-संतांसारखे गिरीकंदात गुहेत किंवा गंगाकिनारी जावून वज्रकठोर तपश्चर्या करणे हे प्रत्येक सर्व प्रापंचिकाचे काम नव्हे. हे लक्षात घेऊन आमच्या दूरदृष्टीच्या परात्पर सद्गुरूंनी व मातृपितृ तुल्य ज्ञानऋषि दत्तदास दहिवलीकर महाराज यांनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर गाणगापूर क्षेत्री खडतर साधना व गुरूचरित्र या अनमोल ग्रंथाची १००८ पारायणे करून दत्तरायांचे दर्शन प्राप्त केले. दत्तरायांकडून कृपा प्रसादाचे फलितही प्राप्त करून घेतले. ते आपल्या शिष्यांकरवी श्री क्षेत्र नारायणपूर / श्री क्षेत्र कळंब / श्री क्षेत्र रायपाटण येथे पेरले. त्या पेरलेल्या बीजांकुरातून सुंदर देखणे कल्पवृक्ष उद्यास आले त्याचे नाव श्री क्षेत्र रायपाटण प्रति गाणगापूर असे म्हटले जाते. श्री क्षेत्र रायपाटण तीर्थक्षेत्रांचे शिल्पकार प.पू.दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी यांनी ध्यान, यज्ञ-याग, नवरात्र उत्सव (१५ वर्षे नैसर्गिक विधी बंद करून अनुष्ठान केले) व जनकल्याणासाठी देह झिजवला. त्याचे फळ सद्गुरूकरवी दत्तवारी हे अमृतरूपी फळ प्राप्त केले व सर्व सामान्य समाजाला वारी हा सर्वात सोपा व सुलभ मार्ग उपलब्ध करून दिला. दत्तवारी या मार्गावर भाविक मोठ्या संख्येने वाटचाल करत आहेत.
वाही हा बहुउद्देशीय आणि उपदेशीय कार्यक्रम. गाणगापूर कलैश्वर या स्थानी संकल्प या स्वरूपात करण्यात आला. दत्ताचिया भक्ता नाही भय चिंता या नामाच्या उच्चाराने देश-परदेशातील हजारो भक्त व्यसन आणि व्याधिमुक्त झाले आहेत. ही पोचपावती प्रत्येक भक्तांकडून मिळते. वास्तविक वारी हा आध्यात्मिक आणि सामाजिक चळवळीचा कार्यक्रम आहे. ही आध्यात्मिक चळवळ दु:ख, दारिद्र्य़, भय, कष्ट, पिशाच्चबाधा या पंचसूत्री तत्त्वांशी समाविष्ट आहे. पंचायतन वारीचे वैशिष्ट्ये म्हणजे वारीचे ५ दिवस, ३६५ दिवसातले ५ दिवस, ५ तत्त्वे, ५ ठिकाणे (श्री क्षेत्र रायपाटण, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र अक्कलकोट, श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र पंढरपूर) पंचम भक्ती. पंचम भक्ती म्हणजे अभिषेक व स्नान वारीमध्ये स्नान पर्वणीला आध्यत्मिक महत्त्व आहे. पवित्र नदीत स्नान केल्याने स्वत:ची पापे धुवून पितरांना मुक्ती देता येते. या दोन्ही गोष्टी स्नान पर्वणीमध्ये साधता येतात. या सगळ्या कार्यक्रमांचा परमोच्च हेतू म्हणजे हरिची कृपा प्राप्त करणे. कारण हर नामाच्या उच्चाराणे जीवाची भूतबाधा नष्ट होते.
वारीच्या पाच दिवसात भजन, दिंडी, ध्यानधारणा व सत्संग करून परमेश्वराची करूणा भाकतो. त्याला आळवतो. त्याला आम्ही आमची दु:खे सांगतो. परमेश्वरा समाजातील लाचारी, अत्याचार, व्यभिचार, उद्योगधंदा आणि आजच्या जीवनातील मॉर्डन जीवन सगळ्यात महत्त्वाचे, संसाराच्या गाड्यातला महत्त्वाचे प्रश्न म्हणजे मुले, शिक्षण, त्यांचे संगोपन, या सगळ्या गोष्टींचा कडेलोट झाला आहे. हे फुलबॉलसारखे जीवन जगता जगता आम्ही खूप थकलो आहे. आम्हाला शांती हवी आहे. तुझ्या कृपाप्रसादाने मंगलमय व शांतीदायी रामराज्य येऊ दे. यासाठी आम्ही सारे भक्तगण चकोर पक्षाप्रमाणे तुझ्या रामराज्याची वाट पाहत आहोत. 

शुभं भवतु... वारी वारी दु:ख निवारी!

                                                           
                               सद्गुरू स्वामी महादेवानंदजी (बांबरकर महाराज)



दत्तराय : दत्तमंदिरात १ ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे. 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:

गुरू-शिष्य परंपरा : श्री संत जनार्दन स्वामी, श्री सदगुरू अप्पा माऊली व श्री सदगुरू दहिवलीकर महाराज.

रायपाटणचा इतिहास

राजापूर तालुक्यातील रायपाटण हे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले गाव आहे. जयसिंगराव पवार यांच्या मराठेकालीन इतिहास या पुस्तकातील २२४ पानावरील नकाशामध्ये रायपाटणची नोंद आढळते. सन १६७४ पासूनच्या मराठ्यांच्या इतिहासात रायपाटणला खरे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. मुंबई-गोवा महामार्गावर लांजा ते राजापूर यादरम्यान ओणी नावाचे गाव आहे. या ओणी गावातून पाचलकडे जाणा-या मार्गावर पाचलच्या आधी २ किमी अंतरावर रायपाटण गाव वसलेले आहे. रायपाटणमध्ये अर्जुना नदीच्या तीरावर श्री संघनाथेश्वराचे फार प्राचीन देवालय आहे. लोकांच्या सांगण्यावरून ते सुमारे १२०० ते १३०० वर्षांपूर्वीचे असावे. या देवालयाचा जीर्णोद्धार श्री शके १६६४ माघ शु. १५ ला झाला असल्याचा पुरावा देणारा शिलालेख तेथ आहे.

संघनाथेश्वराचं मंदिर
या मंदिरातील पिंडीवर अभिषेकाच्यावेळी कलशातून पाणी पडत असताना सिंहनाद ऐकू येतो. हा सिंहनाद म्हणजे अद्यापपर्यंत न उकललेले गूढच आहे. या संघनाथेश्वरावर आधारित एक लोककथा प्रसिद्ध आहे. फार वर्षांपूर्वी रायपाटणमध्ये एका गवळ्याची गाय घरी दूध देत नसे. त्यामुळे गाईवर पाळत ठेवून तो तिच्या मागोमाग रानात गेला, तर एका पिंडीवर ती गाय पान्हा सोडत होती. त्या गवळ्याला गाईचा फार राग आला. त्याला वाटले, गाय आपल्याला दूध देत नाही. तिचा काय उपयोग? म्हणून दुस-या दिवशी गाईच्या मागोमाग कु-हाड घेऊन गेला. त्या दगडावर दुधाची धार सोडण्यासाठी गाय तिथेच असलेल्या झुडपात गेली असताना तिच्यावर त्याने कु-हाडीने वार केले; परंतु गाईवरचे वार चुकले आणि दगडावर पडले. त्या घावांच्या दोन खुणा अद्यापही त्या दगडावर आढळतात.
संघनाथेश्वराजवळील घाट
श्रावण महिन्यातील दर सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी असते. या मंदिराशेजारी स्वामींचा मठ आहे. या समाधीवरूनही १३०० ते १४०० वर्षांपूर्वीचा इतिहास समजतो. येथे बाबाजीय्या स्वामी, रेवणसिद्ध स्वामी, महादय्या स्वामी, चन्नबसवप्पा स्वामी, चन्नमलप्पा स्वामी,  महंतय्या स्वामी, गुरुपदाप्पा स्वामी, दुर्दंडीआप्पा स्वामी, महंतय्या चन्नबसप्पा स्वामी यांच्या समाधी आहेत. इतरीह आणखी दहा समाधी आहेत. मात्र त्यांची नावे सांगता येत नाहीत. शेजारीच बारा ज्योतिर्लिगांपैकी मल्लिकार्जुन तीर्थ आहे. म्हणजे रायपाटणवासीयांचे आराध्यदैवत. ग्रामदेवता श्री वडचाई मंदिर. ते फार प्राचीन मंदिर असून गावाच्या मध्यभागी निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. या देवीची स्थापना फार प्राचीन असलेल्या येथील प्रसिद्ध लोककथेवरून समजते. जवळच असलेल्या राजवाड्यात पूर्वी एक राजा राहात असे. एकदा त्या राजाने सुनेला भरपूर जेवण करायला सांगितले. पण सुनेने थोडेच जेवण केले आणि ती पळून गेली. राजाला फार राग आला. पण तेवढे अन्न सर्व लोकांना पुरले. मग राजाचा राग शांत झाला. त्याने सुनेच्या शोधार्थ माणसे पाठवली. तेव्हा ती वडाच्या झाडामध्ये प्रकट झाली. तीच ही वडचाई होय.
ग्रामदेवता आई वडचाई
रायपाटण गावामध्ये पूर्वी राजवाडाही होता. तेथेच एक भुयार आहे. या भुयाराशेजारी असणारे अवशेष हे, इतिहासकालीन राजवाडा होता हे सिद्ध करतात. हे भुयार मुख्य रस्त्यापासून सुमारे १५० ते २०० मीटर दूर आहे. जुन्या लोकांच्या सांगण्यावरून अर्जुना नदीचा घोडेकोंड हा भाग पूर्वी घोड्यांना पाणी पाजण्यासाठी वापरला जात असे. रायपाटणमध्ये असलेल्या ऐतिहासिक नायकिणीच्या वाड्यावर पेशव्यांच्या काळात नाच-गाण्याचे कार्यक्रम होत असे. रायपाटण येथे प्राचीन काळापासून ते मराठेकालीन संस्कृतीतील नाणी सापडली आहेत. त्यांचा आकार (पंचमार्क), ठसे (सूर्य, अर्धचंद्र, तीन टेकड्यांच्या रांगा) त्यासाठी वापरलेला धातू यावरून ती मराठेकालीन असावीत असा अंदाज आहे.

वडचाई देवीच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे.
रायपाटणच्या जंगलामध्ये १६ व्या शतकातील शैव पंथाची देवी महिषासूरमर्दीनीची मूर्ती सापडली. या देवीचे अलंकरण, आयुधे, किरीट, शिल्पकृती, कोरीव काम यांचा विचार करता ही मूर्ती १५ व्या व १६ व्या शतकातील असावी. रायपाटणपासून जवळच असलेल्या अणुस्कुरा घाटात शिवकालीन/मराठेकालीन शिलालेख सापडला असून त्यावर ४८ अक्षरे आहेत. राजापूरची वखार घेतल्यानंतर शिवाजी महाराज याच मार्गे गेले. या रस्त्याच्या मध्यभागी घोरपिणीचा खडक, भीमाने ढोपर मारून खोदलेली ढोपर विहीर आणि शिलालेखापासून ६५ फुटांवर मराठेकालीन उगवाईचे मंदिर आहे. याशिवाय या भागात सतीची प्रतिमा असणारे सतीस्टोन व वीरांचे पुतळे असणारे हिरास्टोन आढळलेले आहेत. या आणि अशा ब-याचशा पुराव्यांवरून रायपाटण हे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले गाव आहे हे सिद्ध होते.