राजापूर
तालुक्यातील ‘रायपाटण’ हे
ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले गाव आहे. जयसिंगराव पवार यांच्या ‘मराठेकालीन इतिहास’ या पुस्तकातील २२४ पानावरील नकाशामध्ये
रायपाटणची नोंद आढळते. सन १६७४ पासूनच्या मराठ्यांच्या इतिहासात रायपाटणला खरे
ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. मुंबई-गोवा महामार्गावर लांजा ते राजापूर
यादरम्यान ओणी नावाचे गाव आहे. या ओणी गावातून पाचलकडे जाणा-या मार्गावर पाचलच्या
आधी २ किमी अंतरावर रायपाटण गाव वसलेले आहे. रायपाटणमध्ये अर्जुना नदीच्या तीरावर
श्री संघनाथेश्वराचे फार प्राचीन देवालय आहे. लोकांच्या सांगण्यावरून ते सुमारे
१२०० ते १३०० वर्षांपूर्वीचे असावे. या देवालयाचा जीर्णोद्धार श्री शके १६६४ माघ
शु. १५ ला झाला असल्याचा पुरावा देणारा शिलालेख तेथ आहे.
|
संघनाथेश्वराचं मंदिर |
या मंदिरातील
पिंडीवर अभिषेकाच्यावेळी कलशातून पाणी पडत असताना सिंहनाद ऐकू येतो. हा सिंहनाद
म्हणजे अद्यापपर्यंत न उकललेले गूढच आहे. या ‘संघनाथेश्वरा’वर
आधारित एक लोककथा प्रसिद्ध आहे. फार वर्षांपूर्वी रायपाटणमध्ये एका गवळ्याची गाय
घरी दूध देत नसे. त्यामुळे गाईवर पाळत ठेवून तो तिच्या मागोमाग रानात गेला, तर एका
पिंडीवर ती गाय पान्हा सोडत होती. त्या गवळ्याला गाईचा फार राग आला. त्याला वाटले,
गाय आपल्याला दूध देत नाही. तिचा काय उपयोग?
म्हणून दुस-या दिवशी गाईच्या मागोमाग कु-हाड घेऊन गेला. त्या
दगडावर दुधाची धार सोडण्यासाठी गाय तिथेच असलेल्या झुडपात गेली असताना तिच्यावर
त्याने कु-हाडीने वार केले;
परंतु गाईवरचे वार चुकले आणि
दगडावर पडले. त्या घावांच्या दोन खुणा अद्यापही त्या दगडावर आढळतात.
|
संघनाथेश्वराजवळील घाट |
श्रावण महिन्यातील
दर सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी असते. या मंदिराशेजारी स्वामींचा मठ आहे. या
समाधीवरूनही १३०० ते १४०० वर्षांपूर्वीचा इतिहास समजतो. येथे बाबाजीय्या स्वामी,
रेवणसिद्ध स्वामी, महादय्या स्वामी, चन्नबसवप्पा स्वामी, चन्नमलप्पा स्वामी, महंतय्या स्वामी, गुरुपदाप्पा स्वामी,
दुर्दंडीआप्पा स्वामी, महंतय्या चन्नबसप्पा स्वामी यांच्या समाधी आहेत. इतरीह आणखी
दहा समाधी आहेत. मात्र त्यांची नावे सांगता येत नाहीत. शेजारीच बारा
ज्योतिर्लिगांपैकी ‘मल्लिकार्जुन
तीर्थ’ आहे. म्हणजे
रायपाटणवासीयांचे आराध्यदैवत. ग्रामदेवता श्री वडचाई मंदिर. ते फार प्राचीन मंदिर
असून गावाच्या मध्यभागी निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. या देवीची स्थापना फार
प्राचीन असलेल्या येथील प्रसिद्ध लोककथेवरून समजते. जवळच असलेल्या राजवाड्यात
पूर्वी एक राजा राहात असे. एकदा त्या राजाने सुनेला भरपूर जेवण करायला सांगितले.
पण सुनेने थोडेच जेवण केले आणि ती पळून गेली. राजाला फार राग आला. पण तेवढे अन्न
सर्व लोकांना पुरले. मग राजाचा राग शांत झाला. त्याने सुनेच्या शोधार्थ माणसे
पाठवली. तेव्हा ती वडाच्या झाडामध्ये प्रकट झाली. तीच ही ‘वडचाई’ होय.
|
ग्रामदेवता आई वडचाई |
रायपाटण गावामध्ये
पूर्वी राजवाडाही होता. तेथेच एक भुयार आहे. या भुयाराशेजारी असणारे अवशेष हे, ‘इतिहासकालीन राजवाडा’ होता हे सिद्ध करतात. हे भुयार मुख्य
रस्त्यापासून सुमारे १५० ते २०० मीटर दूर आहे. जुन्या लोकांच्या सांगण्यावरून
अर्जुना नदीचा ‘घोडेकोंड’ हा भाग पूर्वी घोड्यांना पाणी पाजण्यासाठी
वापरला जात असे. रायपाटणमध्ये असलेल्या ऐतिहासिक नायकिणीच्या वाड्यावर
पेशव्यांच्या काळात नाच-गाण्याचे कार्यक्रम होत असे. रायपाटण येथे प्राचीन
काळापासून ते मराठेकालीन संस्कृतीतील नाणी सापडली आहेत. त्यांचा आकार (पंचमार्क),
ठसे (सूर्य, अर्धचंद्र, तीन टेकड्यांच्या रांगा) त्यासाठी वापरलेला धातू यावरून ती
मराठेकालीन असावीत असा अंदाज आहे.
|
वडचाई देवीच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. |
रायपाटणच्या जंगलामध्ये
१६ व्या शतकातील शैव पंथाची देवी ‘महिषासूरमर्दीनी’ची मूर्ती सापडली. या देवीचे अलंकरण, आयुधे, किरीट,
शिल्पकृती, कोरीव काम यांचा विचार करता ही मूर्ती १५ व्या व १६ व्या शतकातील
असावी. रायपाटणपासून जवळच असलेल्या अणुस्कुरा घाटात शिवकालीन/मराठेकालीन
शिलालेख सापडला असून त्यावर ४८ अक्षरे आहेत. राजापूरची वखार घेतल्यानंतर शिवाजी
महाराज याच मार्गे गेले. या रस्त्याच्या मध्यभागी घोरपिणीचा खडक, भीमाने ढोपर
मारून खोदलेली ढोपर विहीर आणि शिलालेखापासून ६५ फुटांवर मराठेकालीन उगवाईचे मंदिर
आहे. याशिवाय या भागात सतीची प्रतिमा असणारे ‘सतीस्टोन’ व वीरांचे पुतळे असणारे ‘हिरास्टोन’ आढळलेले आहेत. या आणि
अशा ब-याचशा पुराव्यांवरून रायपाटण हे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले गाव आहे हे
सिद्ध होते.