दत्तराय : दत्तमंदिरात १ ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे. 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:

गुरू-शिष्य परंपरा : श्री संत जनार्दन स्वामी, श्री सदगुरू अप्पा माऊली व श्री सदगुरू दहिवलीकर महाराज.

रायपाटणचा इतिहास

राजापूर तालुक्यातील रायपाटण हे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले गाव आहे. जयसिंगराव पवार यांच्या मराठेकालीन इतिहास या पुस्तकातील २२४ पानावरील नकाशामध्ये रायपाटणची नोंद आढळते. सन १६७४ पासूनच्या मराठ्यांच्या इतिहासात रायपाटणला खरे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. मुंबई-गोवा महामार्गावर लांजा ते राजापूर यादरम्यान ओणी नावाचे गाव आहे. या ओणी गावातून पाचलकडे जाणा-या मार्गावर पाचलच्या आधी २ किमी अंतरावर रायपाटण गाव वसलेले आहे. रायपाटणमध्ये अर्जुना नदीच्या तीरावर श्री संघनाथेश्वराचे फार प्राचीन देवालय आहे. लोकांच्या सांगण्यावरून ते सुमारे १२०० ते १३०० वर्षांपूर्वीचे असावे. या देवालयाचा जीर्णोद्धार श्री शके १६६४ माघ शु. १५ ला झाला असल्याचा पुरावा देणारा शिलालेख तेथ आहे.

संघनाथेश्वराचं मंदिर
या मंदिरातील पिंडीवर अभिषेकाच्यावेळी कलशातून पाणी पडत असताना सिंहनाद ऐकू येतो. हा सिंहनाद म्हणजे अद्यापपर्यंत न उकललेले गूढच आहे. या संघनाथेश्वरावर आधारित एक लोककथा प्रसिद्ध आहे. फार वर्षांपूर्वी रायपाटणमध्ये एका गवळ्याची गाय घरी दूध देत नसे. त्यामुळे गाईवर पाळत ठेवून तो तिच्या मागोमाग रानात गेला, तर एका पिंडीवर ती गाय पान्हा सोडत होती. त्या गवळ्याला गाईचा फार राग आला. त्याला वाटले, गाय आपल्याला दूध देत नाही. तिचा काय उपयोग? म्हणून दुस-या दिवशी गाईच्या मागोमाग कु-हाड घेऊन गेला. त्या दगडावर दुधाची धार सोडण्यासाठी गाय तिथेच असलेल्या झुडपात गेली असताना तिच्यावर त्याने कु-हाडीने वार केले; परंतु गाईवरचे वार चुकले आणि दगडावर पडले. त्या घावांच्या दोन खुणा अद्यापही त्या दगडावर आढळतात.
संघनाथेश्वराजवळील घाट
श्रावण महिन्यातील दर सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी असते. या मंदिराशेजारी स्वामींचा मठ आहे. या समाधीवरूनही १३०० ते १४०० वर्षांपूर्वीचा इतिहास समजतो. येथे बाबाजीय्या स्वामी, रेवणसिद्ध स्वामी, महादय्या स्वामी, चन्नबसवप्पा स्वामी, चन्नमलप्पा स्वामी,  महंतय्या स्वामी, गुरुपदाप्पा स्वामी, दुर्दंडीआप्पा स्वामी, महंतय्या चन्नबसप्पा स्वामी यांच्या समाधी आहेत. इतरीह आणखी दहा समाधी आहेत. मात्र त्यांची नावे सांगता येत नाहीत. शेजारीच बारा ज्योतिर्लिगांपैकी मल्लिकार्जुन तीर्थ आहे. म्हणजे रायपाटणवासीयांचे आराध्यदैवत. ग्रामदेवता श्री वडचाई मंदिर. ते फार प्राचीन मंदिर असून गावाच्या मध्यभागी निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. या देवीची स्थापना फार प्राचीन असलेल्या येथील प्रसिद्ध लोककथेवरून समजते. जवळच असलेल्या राजवाड्यात पूर्वी एक राजा राहात असे. एकदा त्या राजाने सुनेला भरपूर जेवण करायला सांगितले. पण सुनेने थोडेच जेवण केले आणि ती पळून गेली. राजाला फार राग आला. पण तेवढे अन्न सर्व लोकांना पुरले. मग राजाचा राग शांत झाला. त्याने सुनेच्या शोधार्थ माणसे पाठवली. तेव्हा ती वडाच्या झाडामध्ये प्रकट झाली. तीच ही वडचाई होय.
ग्रामदेवता आई वडचाई
रायपाटण गावामध्ये पूर्वी राजवाडाही होता. तेथेच एक भुयार आहे. या भुयाराशेजारी असणारे अवशेष हे, इतिहासकालीन राजवाडा होता हे सिद्ध करतात. हे भुयार मुख्य रस्त्यापासून सुमारे १५० ते २०० मीटर दूर आहे. जुन्या लोकांच्या सांगण्यावरून अर्जुना नदीचा घोडेकोंड हा भाग पूर्वी घोड्यांना पाणी पाजण्यासाठी वापरला जात असे. रायपाटणमध्ये असलेल्या ऐतिहासिक नायकिणीच्या वाड्यावर पेशव्यांच्या काळात नाच-गाण्याचे कार्यक्रम होत असे. रायपाटण येथे प्राचीन काळापासून ते मराठेकालीन संस्कृतीतील नाणी सापडली आहेत. त्यांचा आकार (पंचमार्क), ठसे (सूर्य, अर्धचंद्र, तीन टेकड्यांच्या रांगा) त्यासाठी वापरलेला धातू यावरून ती मराठेकालीन असावीत असा अंदाज आहे.

वडचाई देवीच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे.
रायपाटणच्या जंगलामध्ये १६ व्या शतकातील शैव पंथाची देवी महिषासूरमर्दीनीची मूर्ती सापडली. या देवीचे अलंकरण, आयुधे, किरीट, शिल्पकृती, कोरीव काम यांचा विचार करता ही मूर्ती १५ व्या व १६ व्या शतकातील असावी. रायपाटणपासून जवळच असलेल्या अणुस्कुरा घाटात शिवकालीन/मराठेकालीन शिलालेख सापडला असून त्यावर ४८ अक्षरे आहेत. राजापूरची वखार घेतल्यानंतर शिवाजी महाराज याच मार्गे गेले. या रस्त्याच्या मध्यभागी घोरपिणीचा खडक, भीमाने ढोपर मारून खोदलेली ढोपर विहीर आणि शिलालेखापासून ६५ फुटांवर मराठेकालीन उगवाईचे मंदिर आहे. याशिवाय या भागात सतीची प्रतिमा असणारे सतीस्टोन व वीरांचे पुतळे असणारे हिरास्टोन आढळलेले आहेत. या आणि अशा ब-याचशा पुराव्यांवरून रायपाटण हे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले गाव आहे हे सिद्ध होते.

निसर्गाच्या कुशीत वसलेले दत्त मंदिर

सह्याद्रीच्या तळाशी असलेल्या वनश्रीच्या नंदनवनात, अर्जुना नदीच्या काठावर संगमरवरी दगडांनी सुशोभित केलेलं हे दत्त मंदिर पाहिलं की डोळे दिपून जातात. सकाळच्या प्रहरी तर त्यांचं रूप अधिक लोभसवाणं वाटतं. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर पूर्वेला २१ फूट उंचीचा ग्रॅनाईटचा दीपस्तंभ आहे. त्यावर आंध्र प्रदेशच्या निष्णात कारागिरांनी हस्तकलेचं सुरेख कोरीवकाम केलं आहे.
सदगुरू दत्तदास दहिवलीकर महाराजांनी प्रतिष्ठान केलेल्या श्री दत्त पादुका दक्षिण बाजूला आहेत. त्यांच्यावर छत्र धरलंय औदुंबर पवित्र महावृक्षाने. दक्षिण दरवाजावर दक्षिणमुखी मारुती आहे. हाच दरवाजा मंदिराचं प्रवेशद्वार आहे. उत्तरेकडच्या दर्शनी दरवाजावर श्री दत्तात्रेय विराजमान झाले आहेत. लोक ज्यांची तोंड भरून स्तुती करतात तेच हे श्री क्षेत्र रायपाटण अर्थात प्रतिगाणगापूर!
दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर, रायपाटण.
मराठेशाहीच्या  अथवा त्यापूर्वी सुद्धा रायपाटण ही एक मोठी बाजारपेठ होती. पण मराठेशाहीच्या पडत्या काळात ती मोगलांकडून उद्ध्वस्त केली गेली. मराठ्यांच्या वाड्यांचे भग्नावस्थेतील अवशेष मात्र त्याची साक्ष देत उभे आहेत. इतिहासजमा झालेलं रायपाटण आता पुन्हा प्रकाशात येतंय ते या दत्तदास मंदिरामुळेच!  गुरुविना भक्तिमार्ग वाटतो तितका सोपा नाही. मार्गात कुठेही अडथळा आला तर सदगुरूच पैलतीरावर नेतात ते अगदी मातेच्या ममतेने शिष्याच्या पाठीवर हात फिरवीत. याच कारणाने सदगुरूंना मात व माऊली म्हणून संबोधतात. ही गुरू परंपरा सदगुरू श्री क्षेत्र दत्तात्रेयांपासून सुरू झाली आहे.
सदगुरू दत्तदासांचे दास महादेवानंदजी बांबरकर महाराज यांचे सदगुरू दत्तदास दहिवलीकर महाराज एक सिद्धपुरूष होऊन गेले. त्यांनीच या क्षेत्र रायपाटणला बसविलेल्या श्री दत्त पादुका पुणे, कोल्हापूर, पंढरपूर, कल्याण, ठाणे, पनवेल ते सिंधुदूर्गपर्यंत सर्वधर्मियांचे श्री क्षेत्र रायपाटण हे आता श्रद्धास्थान बनलेलं आहे. याचे कारण आहे चैतन्य सदगुरू दत्तदास दहिवलीकर महाराज. श्री क्षेत्र रायपाटण ही सदगुरूंकडून प्रिय शिष्याला लाभलेली अमूल्य ठेव आहे. आनंदित राखणारी गुरूपरंपरेची बाग येथे आहे. त्या बागेतून सदगुरू बांबरकर महाराज सदगुरूच्या आशीर्वादाने यथायोग्य फुले फुलवीत आहेत. सदगुरूंनी लावलेली ही गुरू परंपरेची वेल शिष्योत्तम बांबरकर महाराजांनी श्रद्धेने, अतिमेहनतीने, काळजीपूर्वक जोपासली आहे. प्रवचने, रुद्राभिषेक, कीर्तन, नामस्मरण, योग, हवन, ग्रंथ पारायणे आदी मार्गांनी मंदिराचे पावित्र्य वाढवीत आहेत. त्यामुळे या भागाला प्रतिगाणगापूरचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाविक आज श्रद्धेने येथे येतात. दर्शन घेतात संकल्प सोडतात. त्याप्रमाणे श्री दत्तात्रेय सदगुरू त्यांच्या मनोकामनाही पूर्ण करतात.
राजापूर येथून ३० किलोमीटर अंतरावर रायपाटण गाव आहे. या गावातील रायपाटण रुग्णालयासमोर श्री क्षेत्र रायपाटण असा फलक आहे. त्या मार्गाने आपण बांबरकरवाडीकडे जातो. दोन मिनिटं चाललं की, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेलं दत्तदास दत्त मंदिर आपल्या दृष्टिस पडतं आणि पहिल्या दृष्टिक्षेपात आपले डोळे सुखावतात; तो पांढरा शुभ्र रंग पाहून मन निर्विकार बनतं. मंदिरावरील वैराग्याचं व्रत घेऊन फडकत असलेलं भगवं निशाण डोळ्यांना आकर्षूण घेतं आणि मन प्रफुल्लित होतं. मंदिराबद्दलचं कुतूहल आणखी वाढत जातं. रात्री प्रकाशाच्या झोतात हे पांढरे शुभ्र मंदिर अप्रतिम वाटतं. त्यावरील आणि दत्त मंदिर ही भगवी अक्षरं नजर वेधून घेतात. मंदिराच्या पूर्व दिशेला असलेला अष्टदिशांना उजळणारा दीपस्तंभ तर त्याची आणखीनच शोभा वाढवितो. हा दीपस्तंभ फार निराळ्या पद्धतीने तयार केला गेला आहे. दीपमाळा, त्यांची घडण आणि ठेवणही वेगळी आहे. त्यामुळे तो मन वेधून घेतो. दिवसा निसर्गाच्या सान्निध्यात हे मंदिर पाहाताना सृष्टिसौंदर्याचं वर्णन करणे कठीणच.
आपण ज्या मंदिराच्या आवारात उत्तर दिशेने प्रवेश करतो. समोर दरवाजा आहे; पण हा प्रवेश बंद आहे. डाव्या बाजूला वळून पूर्वेला गेलं की दीपस्तंभाचं दर्शन होतं. त्या प्रथम नमस्कार करून पुढे दक्षिण कोनाजवळ वळून उजवीकडे दक्षिण दरवाजावरून औदुंबराखाली श्री क्षेत्र दत्त पादुकांचे दर्शन घ्यायचे. प्रदक्षिणा घालून पुन्हा दक्षिण दरवाजावर बसलेल्या दक्षिणमुखी मारुतीला नमस्कार करून मंदिरात प्रवेश करायचा. प्रथम गणेश नंतर दत्तदास दहिवलीकर महाराज, मारुती, सांब सदाशिव, दत्तात्रेय आणि माता भवानी अशा क्रमाने दर्शन झालं की मध्यभागी असलेल्या हवनकुंडाला नमस्कार करायचा.
इथे येणारे भाविक कुठल्या ना कुठल्या तरी अडचणीत सापडलेले असतात. ज्यांना इथल्या संकल्पाचा पूर्ण अनुभव आला आहे. अशा व्यक्तीने आपला अनुभव सांगून त्यांना पाठविलेलं असतं. ते सदगुरू बांबरकर महाराजांना भेटतात. त्यांची आपुलकीनं विचारपूस केल्यावर महाराज त्यांना मार्गदर्शन करतात. त्याप्रमाणे त्यांचा संकल्प दर गुरूवारी व पौर्णिमेला दत्त पादुकांजवळ सोडला जातो. या गोष्टी फक्त गुरूवार व पौर्णिमेलाच होतात. ज्यांचे संकल्प पूर्ण झालेले असतात. अर्थात त्या अवधीत त्यांच्या अडचणीही दूर झालेच्या असतात. पौर्णिमेला संकल्पाची सांगता केली जाते. दर गुरूवारी आणि पौर्णिमेला भाविकांच्या उपस्थितीमुळे हे मंदिर गजबजलेलं असतं. एका मागोमाग एक अशा त-हेने प्रत्येक जण अडचणीतून मुक्त होतो. श्री दत्तात्रेयांची कृपा, दत्तदासांचे आशीर्वाद आणि त्यांचे शिष्य बांबरकर महाराज यांची नि:स्वार्थी साधना या सर्व गोष्टींचा मेळ घातला की याची सत्यता पटते. व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमामुळे आज अनेक कुटुंब सुखी झाली आहेत. आज जिथे दत्तदास दत्त मंदिर उभं आहे ती पूर्वीची बांबरकरवाडी आणि आताची बांबरकरवाडी यात जमीनआस्मानाचा फरक जाणवल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते. रोज मंदिरात आरती, भजन हे कार्यक्रम नित्याने होतात. लोक आपापली दिवसाची कामे आटोपून इथे भक्तिभावाने येतात. शेवटी सदगुरू बांबरकर महाराजांचे मार्गदर्शन असतं.
लेखक विनोद करंदीकर
  

|| सदगुरू महादेवानंदजी बांबरकर महाराज यांची सुवचने ||


|| शिष्य भगवंताच्या शक्तीने भगवंताच्या नामस्मरणाशी जोडला गेला, तर तो गुरू होऊ शकतो. ||

|| परमेश्वराच्या आराधनेतून सौख्यप्राप्ती होते आणि नापजप हे त्याचे माध्यम आहे. ||

|| आध्यात्मिक उन्नतीसाठी माणसांचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. ||

|| जो मनुष्य जनकल्याणासाठी धडपडतो त्याचे ईश्वर कल्याण करतो. ||

|| जो सतत स्वत:मध्ये ईश्वर पाहतो, तो ईश्वर समीप असतो. ||

|| भक्ती करताना शरीर निरोगी असणं अत्यंत महत्त्वाचं. ||

|| तुम्ही जगाचे कल्याणम करा, ईश्वर तुमचे करेल. ||

|| मन निरोगी राहाण्यासाठी शरीर निरोगी हवं. ||




|| गुरू म्हणजे गुरूंचा स्थूल देह नाही. गुरूंच्या देहात जे चेतन तत्त्व आहे, ते म्हणजेच गुरू होय. ||

|| येणारा काळ अत्यंत प्रतिकूल असेल त्या काळामध्ये नामसाधनेत असणाराच तरेल. ||

|| दृष्ट विचारांना नष्ट करण्यासाठी नामस्मरण, चिंतन करणे महत्त्वाचे आहे. ||

|| नामजपातून मनाच्या व्यथा तर दूर होतातच, पण मन:शांतीही मिळते. ||

|| सध्याच्या खडतर काळासाठी नियमित साधना आवश्यक. ||

|| संतांच्या मार्गाने भक्ती केल्यास ईश्वर प्रसन्न होतो. ||

|| संत आहेत त्या स्थळी अधर्म टिकणार नाही. ||

|| संतांचे कार्य एकाच ईश्वरासाठी आहे. ||

गुरू परंपरा

|| श्री ||

नमो आदिनाथ गुरू प्रथम | त्याचे पायी नमस्कार भक्तीभावे ||१||
तयापासून आदिमाया शिव-शक्ती बीज | मिळाले ते सहजमत्स्येंद्राते ||२||
मत्स्येंद्राने बीज दिले गोरक्षाप्रती | गोरक्षे गहिनी धन्य केला ||३||
गहिनीनाथे बोध दिली निवृत्तीसी | निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा ||४||
ज्ञानदेवा शिष्य विसोबा खेचर | ऐसे झाले मुनि वामनादि ||५|| 
वामनाची स्फूर्ति अाप्पा माऊलीला | माऊलीने वरदहस्त जगन्नाथे ठेविला ||६||
जगन्नाथा शरणांगत असे महादेव | पुढे झाले ऐसे शिष्य असंख्यात ||७|| 
योगसार ऐसे संत परंपराप्राप्त | सदगुरू जगन्नाथ देई मज ||८||
महादेव म्हणे धन्य झाले जीवन | सदगुरू चरण धरूनिया ||९||
                                                                    - दत्तदासांचे दीनदास महादेव बांबरकर महाराज

श्री भगवंत हेच सदगुरू

प्रिय भाविक व शिष्यगण,
भगवंताने दर्शविलेले दहा (मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्कि ) अवतारांचा विचार करिता चालू काळ कलियुगाचा आहे. आणि या कलियुगात धर्मावरील श्रद्धा उडत चालली आहे. स्वत:ला नास्तिक समजणारी व्यक्तीही मंदिरातील मूर्तीकडे पाहून प्रसन्न होते आणि मनातल्यामनांत नकळत का होईना विनम्र होतेच.
सदगुरू महादेवानंदजी बांबरकर महाराज
श्री भगवंत हेच सद्गुरू आहेत. श्री सद्गुरू हे कधीच शिष्य करीत नाहीत तर ते सद्गुरू तयार करीत असतात. शिष्याचे शरीर हे सद्गुरूसाठी ईश्वराचे मंदिर आहे. सद्गुरूंनी दिलेले नाम हे केवळ नाम अक्षर किंवा शब्द नाही या नामामध्ये या शक्तीचा संचार हीच सद्गुरूंची दीक्षा आहे.
ईश्वराची शक्ती सर्वांमध्ये आहे. शिष्याच्या शक्तीला जागृत करण्याला शक्ती संचार असे म्हणतात ही शक्ती निद्रावस्थेत असते. जे लोक श्वास प्र-श्वासावर नामजप करीत तिला पुन्हा झोपू देत नाहीत त्या शक्तीमध्ये ती शक्ती विशेष करून कार्य करीत असते.
वृक्षाप्रमाणे सहनशील व्हावे. धन, सन्मान इत्यादी गुणांनी श्रेष्ठ राहूनही या सर्वांचा गर्व करू नये. आपल्या अभिमानाचा त्याग करून नामजप केल्याने फळ प्राप्त होते. यासाठी धर्मग्रंथांचे वाचन, गुरू आज्ञेचे पालन आणि माता-पिता गुरूजन यांची सेवा आवश्यक आहे.
आहाराशी धर्माची संबंध नाही. शरीर आणि आत्मा एकत्रच राहातात हा आहार योग्य रूपात केला नाही तर धर्म नष्ट होतो.
प्रत्येक घासाला नामजप केला पाहिजे. भोजनाचे प्रमाण आणि वेळ योग्य ठेवल्यास शरीराबाबत कोणताही त्रास राहात नाही.
रात्री झोपण्यापूर्वी सकाळी, उठण्याच्यावेळी साधन, भजन करण्याच्या आधी आणि ते झाल्यावर खाली दिलेल्या मंत्राचे स्मरण करीत नमस्कार करावा. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने| प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ||
सत्ययुगात ध्यान आणि यज्ञ हाच धर्म आहे. तर त्रेतायुगात ज्ञान आणि यज्ञ व धर्म सांगितला आहे. द्वापारयुगातला धर्म देवता आणि संत महात्मे यांच्याशी परिचर्या आणि त्याची पूजा आहे. तर कलियुगात फक्त नामपज आणि दान हाच धर्म सांगितला आहे.
गाईला जर दुसरीकडे न्यावयाचे असेल तर गुराखी तिच्या वासराला घेऊन पुढे चालतो. जेणेकरून गाय इकडे तिकडे न पाहता वासराच्या मागे चालू लागते. त्याचप्रमाणे परमेश्वराला प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल तर त्याच्या चरणांचा आश्रय घेतलेल्या भगवदभक्तांना शरण जा. आशा त-हेने दो भगवदभक्तांचा आश्रय घेऊन आत्मसमर्पण करतो, त्याच्याविषयी परमेश्वर नेहमीच काळजी घेतो.
कलियुगात फक्त नामजप आणि दानधर्म हाच सांगितला आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन यांचा संयम पाळणे आवश्यक आहे. धन किंवा पैसा कितीही मिळाला तरी मनाची कधीही तुप्ती होत नाही; असा मनाचा स्वभावच आहे. कनक आणि कांता या दोनच गोष्टी सर्व अनिष्ठांचे मूळ आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी श्रद्धा असणे आवश्यक आहे. ती जर नसेल तर कुणाचे घरदार, कुणाच्या गायी, म्हैशी?  जरी राम नाम न घेशी | आत्मा जाईल उपाशी || अशाप्रमाणे होईल. त्यातून बाहेर पडण्यासाठी अखंड नाम-जप, साधना श्वास प्र-श्वासावर करीत रहाणे. त्यानेच आपणांस सर्व काही प्राप्त होईल.
श्री श्रेत्र रायपाटण राजापूर तालुक्यातील (जिल्हा रत्नागिरी) दत्तमंदिरात आतापर्यंत हजारो लोक व्यसनमुक्त झाले आहे. अनेक प्रकारच्या अडचणींमुळे त्रस्त झालेले लोक सद्गुरू आशार्वादाने सुखी झाले आहेत. सद्गुरू रूपी परमेश्वर आपल्याला उत्तरोत्तर भरभराट करून आयु-आरोग्य प्राप्त होवो, ही दत्त चरणी प्रार्थना.


- दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी (बांबरकर महाराज)

अमृत महोत्सवी (७५) वर्षपूर्ती व पाद्यपूजन सोहळा


दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी महाराज यांचा अमृत महोत्सवी (७५) वर्षपूर्ती व पाद्यपूजन सोहळा रविवारी (२१ ऑगस्ट, २०१६) भांडूप येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास मुंबई, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी (रायपाटण) येथील शिष्य परिवार आले होते. सदर सोहळ्यात महाराजांच्या पाद्यपूजनासोबतच भजनसंध्या, अथर्वशीर्ष पठण, रूद्र पठण, दत्तगुरू भ्यो मंत्र आदी धार्मीक कार्यक्रम तसेच दहावी, बारावी, पदवी व विशेष योगदान मिळविलेल्या विद्यार्थ्यांना महाराजांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले. या कार्यक्रमानंतर महाराजांचा अध्यात्मिक प्रवास उलगडवणारी ध्वनीचित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली. त्यानंतर महाराजांचे शिष्यांना मार्गदर्शन व दर्शनाचा कार्यक्रम झाला. दर्शनानंतर उपस्थित शिष्य, भक्तगणांना महाप्रसाद देवून सोहळ्याची सांगता करण्यात आली. 

चैतन्य सदगुरू दत्तदास दहिवलीकर महाराज

चैतन्य सदगुरू दहिवलीकर महाराजांचे समाधी स्थळ.

रायपाटण निवासी दत्त

दत्तराय : रायपाटण (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील मंदिरात साक्षात दत्तगुरूंचा वास अाहे.

सर्वधर्म सत्संग परिषद

गोवा येथे भरविण्यात आलेल्या सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माची महती मांडण्यासाठी रायपाटण येथील दत्तदासांचे दास महादेवानंदजी बांबरकर महाराज उपस्थित होते.