सह्याद्रीच्या
तळाशी असलेल्या वनश्रीच्या नंदनवनात, अर्जुना नदीच्या काठावर संगमरवरी दगडांनी
सुशोभित केलेलं हे दत्त मंदिर पाहिलं की डोळे दिपून जातात. सकाळच्या प्रहरी तर
त्यांचं रूप अधिक लोभसवाणं वाटतं. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर पूर्वेला २१ फूट
उंचीचा ग्रॅनाईटचा दीपस्तंभ आहे. त्यावर आंध्र प्रदेशच्या निष्णात कारागिरांनी
हस्तकलेचं सुरेख कोरीवकाम केलं आहे.
सदगुरू दत्तदास
दहिवलीकर महाराजांनी प्रतिष्ठान केलेल्या श्री दत्त पादुका दक्षिण बाजूला आहेत.
त्यांच्यावर छत्र धरलंय औदुंबर पवित्र महावृक्षाने. दक्षिण दरवाजावर दक्षिणमुखी
मारुती आहे. हाच दरवाजा मंदिराचं प्रवेशद्वार आहे. उत्तरेकडच्या दर्शनी दरवाजावर
श्री दत्तात्रेय विराजमान झाले आहेत. लोक ज्यांची तोंड भरून स्तुती करतात तेच हे
श्री क्षेत्र रायपाटण अर्थात प्रतिगाणगापूर!
दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर, रायपाटण. |
सदगुरू
दत्तदासांचे दास महादेवानंदजी बांबरकर महाराज यांचे सदगुरू दत्तदास दहिवलीकर
महाराज एक सिद्धपुरूष होऊन गेले. त्यांनीच या क्षेत्र रायपाटणला बसविलेल्या श्री
दत्त पादुका पुणे, कोल्हापूर, पंढरपूर, कल्याण, ठाणे, पनवेल ते सिंधुदूर्गपर्यंत
सर्वधर्मियांचे ‘श्री
क्षेत्र रायपाटण’ हे
आता श्रद्धास्थान बनलेलं आहे. याचे कारण आहे चैतन्य सदगुरू दत्तदास दहिवलीकर
महाराज. श्री क्षेत्र रायपाटण ही सदगुरूंकडून प्रिय शिष्याला लाभलेली अमूल्य ठेव
आहे. आनंदित राखणारी गुरूपरंपरेची बाग येथे आहे. त्या बागेतून सदगुरू बांबरकर
महाराज सदगुरूच्या आशीर्वादाने यथायोग्य फुले फुलवीत आहेत. सदगुरूंनी लावलेली ही
गुरू परंपरेची वेल शिष्योत्तम बांबरकर महाराजांनी श्रद्धेने, अतिमेहनतीने,
काळजीपूर्वक जोपासली आहे. प्रवचने, रुद्राभिषेक, कीर्तन, नामस्मरण, योग, हवन,
ग्रंथ पारायणे आदी मार्गांनी मंदिराचे पावित्र्य वाढवीत आहेत. त्यामुळे या भागाला
प्रतिगाणगापूरचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाविक आज श्रद्धेने येथे येतात. दर्शन
घेतात संकल्प सोडतात. त्याप्रमाणे श्री दत्तात्रेय सदगुरू त्यांच्या मनोकामनाही
पूर्ण करतात.
राजापूर येथून ३०
किलोमीटर अंतरावर रायपाटण गाव आहे. या गावातील रायपाटण रुग्णालयासमोर श्री क्षेत्र
रायपाटण असा फलक आहे. त्या मार्गाने आपण बांबरकरवाडीकडे जातो. दोन मिनिटं चाललं
की, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेलं दत्तदास दत्त मंदिर आपल्या दृष्टिस पडतं
आणि पहिल्या दृष्टिक्षेपात आपले डोळे सुखावतात; तो पांढरा शुभ्र रंग पाहून मन निर्विकार बनतं. मंदिरावरील
वैराग्याचं व्रत घेऊन फडकत असलेलं भगवं निशाण डोळ्यांना आकर्षूण घेतं आणि मन
प्रफुल्लित होतं. मंदिराबद्दलचं कुतूहल आणखी वाढत जातं. रात्री प्रकाशाच्या झोतात
हे पांढरे शुभ्र मंदिर अप्रतिम वाटतं. त्यावरील ॐ आणि दत्त मंदिर ही भगवी अक्षरं नजर वेधून घेतात. मंदिराच्या पूर्व दिशेला
असलेला अष्टदिशांना उजळणारा दीपस्तंभ तर त्याची आणखीनच शोभा वाढवितो. हा दीपस्तंभ
फार निराळ्या पद्धतीने तयार केला गेला आहे. दीपमाळा, त्यांची घडण आणि ठेवणही वेगळी
आहे. त्यामुळे तो मन वेधून घेतो. दिवसा निसर्गाच्या सान्निध्यात हे मंदिर पाहाताना
सृष्टिसौंदर्याचं वर्णन करणे कठीणच.
आपण ज्या
मंदिराच्या आवारात उत्तर दिशेने प्रवेश करतो. समोर दरवाजा आहे; पण हा प्रवेश बंद आहे. डाव्या
बाजूला वळून पूर्वेला गेलं की दीपस्तंभाचं दर्शन होतं. त्या प्रथम नमस्कार करून
पुढे दक्षिण कोनाजवळ वळून उजवीकडे दक्षिण दरवाजावरून औदुंबराखाली श्री क्षेत्र
दत्त पादुकांचे दर्शन घ्यायचे. प्रदक्षिणा घालून पुन्हा दक्षिण दरवाजावर बसलेल्या
दक्षिणमुखी मारुतीला नमस्कार करून मंदिरात प्रवेश करायचा. प्रथम गणेश नंतर दत्तदास
दहिवलीकर महाराज, मारुती, सांब सदाशिव, दत्तात्रेय आणि माता भवानी अशा क्रमाने
दर्शन झालं की मध्यभागी असलेल्या हवनकुंडाला नमस्कार करायचा.
इथे येणारे भाविक कुठल्या
ना कुठल्या तरी अडचणीत सापडलेले असतात. ज्यांना इथल्या संकल्पाचा पूर्ण अनुभव आला
आहे. अशा व्यक्तीने आपला अनुभव सांगून त्यांना पाठविलेलं असतं. ते सदगुरू बांबरकर
महाराजांना भेटतात. त्यांची आपुलकीनं विचारपूस केल्यावर महाराज त्यांना मार्गदर्शन
करतात. त्याप्रमाणे त्यांचा संकल्प दर गुरूवारी व पौर्णिमेला दत्त पादुकांजवळ
सोडला जातो. या गोष्टी फक्त गुरूवार व पौर्णिमेलाच होतात. ज्यांचे संकल्प पूर्ण
झालेले असतात. अर्थात त्या अवधीत त्यांच्या अडचणीही दूर झालेच्या असतात.
पौर्णिमेला संकल्पाची सांगता केली जाते. दर गुरूवारी आणि पौर्णिमेला भाविकांच्या
उपस्थितीमुळे हे मंदिर गजबजलेलं असतं. एका मागोमाग एक अशा त-हेने प्रत्येक जण
अडचणीतून मुक्त होतो. श्री दत्तात्रेयांची कृपा, दत्तदासांचे आशीर्वाद आणि त्यांचे
शिष्य बांबरकर महाराज यांची नि:स्वार्थी साधना या सर्व गोष्टींचा मेळ घातला की याची सत्यता
पटते. व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमामुळे आज अनेक कुटुंब सुखी झाली आहेत. आज जिथे
दत्तदास दत्त मंदिर उभं आहे ती पूर्वीची बांबरकरवाडी आणि आताची बांबरकरवाडी यात
जमीनआस्मानाचा फरक जाणवल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते. रोज मंदिरात आरती, भजन
हे कार्यक्रम नित्याने होतात. लोक आपापली दिवसाची कामे आटोपून इथे भक्तिभावाने
येतात. शेवटी सदगुरू बांबरकर महाराजांचे मार्गदर्शन असतं.
- लेखक विनोद
करंदीकर