प्रिय भाविक व शिष्यगण,
भगवंताने दर्शविलेले दहा (मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम,
कृष्ण, बौद्ध आणि कल्कि ) अवतारांचा विचार करिता चालू काळ कलियुगाचा आहे. आणि या
कलियुगात धर्मावरील श्रद्धा उडत चालली आहे. स्वत:ला नास्तिक समजणारी
व्यक्तीही मंदिरातील मूर्तीकडे पाहून प्रसन्न होते आणि मनातल्यामनांत नकळत का
होईना विनम्र होतेच.
सदगुरू महादेवानंदजी बांबरकर महाराज |
श्री भगवंत हेच सद्गुरू आहेत. श्री सद्गुरू हे कधीच शिष्य करीत नाहीत तर ते
सद्गुरू तयार करीत असतात. शिष्याचे शरीर हे सद्गुरूसाठी ईश्वराचे मंदिर आहे.
सद्गुरूंनी दिलेले नाम हे केवळ नाम अक्षर किंवा शब्द नाही या नामामध्ये या शक्तीचा
संचार हीच सद्गुरूंची दीक्षा आहे.
ईश्वराची शक्ती सर्वांमध्ये आहे. शिष्याच्या शक्तीला जागृत करण्याला शक्ती
संचार असे म्हणतात ही शक्ती निद्रावस्थेत असते. जे लोक श्वास प्र-श्वासावर नामजप
करीत तिला पुन्हा झोपू देत नाहीत त्या शक्तीमध्ये ती शक्ती विशेष करून कार्य करीत
असते.
वृक्षाप्रमाणे सहनशील व्हावे. धन, सन्मान इत्यादी गुणांनी श्रेष्ठ राहूनही या
सर्वांचा गर्व करू नये. आपल्या अभिमानाचा त्याग करून नामजप केल्याने फळ प्राप्त
होते. यासाठी धर्मग्रंथांचे वाचन, गुरू आज्ञेचे पालन आणि माता-पिता गुरूजन यांची
सेवा आवश्यक आहे.
आहाराशी धर्माची संबंध नाही. शरीर आणि आत्मा एकत्रच राहातात हा आहार योग्य
रूपात केला नाही तर धर्म नष्ट होतो.
प्रत्येक घासाला नामजप केला पाहिजे. भोजनाचे प्रमाण आणि वेळ योग्य ठेवल्यास
शरीराबाबत कोणताही त्रास राहात नाही.
रात्री झोपण्यापूर्वी सकाळी, उठण्याच्यावेळी साधन, भजन करण्याच्या आधी आणि ते
झाल्यावर खाली दिलेल्या मंत्राचे स्मरण करीत नमस्कार करावा. ओम कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने| प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ||
सत्ययुगात ध्यान आणि यज्ञ हाच धर्म आहे. तर त्रेतायुगात ज्ञान आणि यज्ञ व धर्म
सांगितला आहे. द्वापारयुगातला धर्म देवता आणि संत महात्मे यांच्याशी परिचर्या आणि
त्याची पूजा आहे. तर कलियुगात फक्त नामपज आणि दान हाच धर्म सांगितला आहे.
गाईला जर दुसरीकडे न्यावयाचे असेल तर गुराखी तिच्या वासराला घेऊन पुढे चालतो.
जेणेकरून गाय इकडे तिकडे न पाहता वासराच्या मागे चालू लागते. त्याचप्रमाणे
परमेश्वराला प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल तर त्याच्या चरणांचा आश्रय
घेतलेल्या भगवदभक्तांना शरण जा. आशा त-हेने दो भगवदभक्तांचा आश्रय घेऊन आत्मसमर्पण
करतो, त्याच्याविषयी परमेश्वर नेहमीच काळजी घेतो.
कलियुगात फक्त नामजप आणि दानधर्म हाच सांगितला आहे. आहार, निद्रा, भय आणि
मैथुन यांचा संयम पाळणे आवश्यक आहे. धन किंवा पैसा कितीही मिळाला तरी मनाची कधीही
तुप्ती होत नाही; असा मनाचा स्वभावच आहे. कनक आणि कांता या दोनच
गोष्टी सर्व अनिष्ठांचे मूळ आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी श्रद्धा असणे आवश्यक
आहे. ती जर नसेल तर कुणाचे घरदार, कुणाच्या गायी, म्हैशी? जरी राम नाम न घेशी | आत्मा जाईल उपाशी || अशाप्रमाणे होईल. त्यातून बाहेर पडण्यासाठी अखंड
नाम-जप, साधना श्वास प्र-श्वासावर करीत रहाणे. त्यानेच आपणांस सर्व काही प्राप्त
होईल.
श्री श्रेत्र रायपाटण राजापूर तालुक्यातील (जिल्हा रत्नागिरी) दत्तमंदिरात आतापर्यंत
हजारो लोक व्यसनमुक्त झाले आहे. अनेक प्रकारच्या अडचणींमुळे त्रस्त झालेले लोक
सद्गुरू आशार्वादाने सुखी झाले आहेत. सद्गुरू रूपी परमेश्वर आपल्याला उत्तरोत्तर
भरभराट करून आयु-आरोग्य प्राप्त होवो, ही दत्त चरणी प्रार्थना.
- दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी (बांबरकर महाराज)